below is my recently published article on the Arihant Submarine that was inducted in the Indian Navy, courtesy Maharashtra Times
'अरिहंत पाणबुडी': शस्त्रसज्जतेचा कळस !
२६ जुलै रोजी ' आयएनएस अरिहंत ' ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विक पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाली . अशाप्रकारे भारताने संरक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे . ' अरिहंत ' पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारी ही भारताची पहिली पाणबुडी आहे . ६ हजार टन वजनाची ही पाणबुडी ११० मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ' अरिहंत ' वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ' अरिहंत ' ची मारक क्षमता ७०० किलोमीटर एवढी आहे . आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हा जगातला सहावा देश झाला आहे .
युद्धसज्जतेच्या दृष्टिकोनातून ' अरिहंत ' भारताची आण्विक शस्त्राबाबतची विचारधारा आणखी मजबूत करते . कारण आण्विक इंधनामुळे ' अरिहंत ' ची क्षमता भारताच्या पारंपरिक पाणबुड्यांपेक्षा अनेक पटीने वाढली आहे . त्यामुळे जर भारताला एखाद्या मोठ्या युद्धाला सामोरे जावे लागले आणि शत्रूच्या प्रथम हल्ल्यात भारताची जमिनीवरची अण्वस्त्रे आण्विक हल्ल्यात नष्ट झालीच तर ' अरिहंत ' सारखी पाणबुडी भारताच्या अण्वस्त्रक्षमतेचा शत्रूच्या नजरेपासून सांभाळू करू शकते . आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी जास्त दिवस पाण्याखाली राहू शकते . नव्या संशोधनामुळे शत्रूला ' अरिहंत ' चा अचूक ठिकाणा आणि मार्गाविषयी निदान करणेही अवघड आहे . याचा एकूण परिणाम म्हणजे आता आपले सुरक्षा नियोजक आपल्या अण्वस्त्राच्या सुरक्षेबाबत निश्चिंतही राहू शकतात .
भारताची ही नवी पाणबुडी शत्रूंना भारतावर अण्वस्त्रहल्ला करण्याआधी पुनर्विचार करण्यास भाग पाडेल . कारण अशाप्रकारचा हल्ला करून त्यांना भारताची संपूर्ण आण्विक शस्त्रे संपवण्यात कधीच पूर्णतः यश मिळणार नाही . याउलट ' अरिहंत ' ची जागा आणि त्यावरील शस्त्रांची माहिती नसल्यामुळे शत्रूच्या आत्मविश्वासात फरक पडू शकतो . एकंदरीत या गटातल्या पाणबुडीच्या समावेशामुळे दक्षिण आशियातील अण्वस्त्रयुद्धाची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे .
'INS अरिहंत ' आणि पाकिस्तानचा कांगावाः
पाकिस्तानला भारताची ही नवी क्षमता योग्य प्रकारे समजून घ्यावी लागणार आहे . दुर्दैवाने आपला शेजारी दूरदृष्टिने विचार करण्यासाठी अजूनही तयार झालेला नाही . पाकिस्तानने भारताच्या या कृतीवर टीका केली आहे . एकूणच पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती . कारण प्रादेशिक भेदभाव आणि आतंकवादाने त्रस्त झालेल्या पाकिस्तानचे नेतृत्व आता आण्विक शस्त्रांच्या नावाखाली पाकिस्तानात राष्ट्रवाद रेटू शकत नाही . भारताची कुठलीही कृती नकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्यानावाखाली आपले अस्तित्व सांभाळण्याची सवय पाकिस्तानी नेतृत्वाला झाली आहे . त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे आपण डोळेझाक करू शकतो . पण जगातले इतर देश पाकच्या या कांगाव्याला बळी पडून त्याला आधुनिक हत्यारे देणार नाही याची खात्री बाळगावी लागेल . कारण यापूर्वी असे झालेले आहे .
पाकिस्तान कदाचित चीनची भाषा तर बोलत नाही ना हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल . चीनने हिंद महासागरात स्वतःची रुची दाखवलेली आहे . अमेरिकेविरुद्ध जर युद्ध करावे लागले तर पश्चिम आशिया मधून येणा - या तेलाचे मार्ग सुरक्षित ठेवावे लागतील हे चीनचे नेतृत्व जाणून आहे . कारण त्याशिवाय चीनची अर्थव्यवस्था ठप्प होईल . त्यामुळे चीनच्या सैन्याच्या आधुनिकीकरणात नौदलावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे . भारतालादेखील हे गणित विसरून चालणार नाही .
वाढत्या आर्थिक आणि सामरिक गरजांचे रक्षण करण्यासाठी भारताची नौदल युद्धक्षमता सुसज्ज असणे अत्यावश्यक आहे . त्यामुळे भारताचे हे पाऊल योग्य असेच आहे . येत्या दोन वर्षात ' आरिहंत ' च्या अनेक चाचण्या होतील . त्यानंतर ती पूर्णपणे कार्यरत होणार आहे . आपली ही पहिली आण्विक पाणबुडी महत्वाची आहे . पण हे पूर्ण यश नाही . कारण चीनकडे आत्ता अश्या दहा पाणबुड्या आहेत . आणि त्यांची क्षमता कितीतरी पटीने अधिक आहे . शिवाय येत्या काळात त्यांची क्षमता कितीतरी पटीने वाढणार आहे .
स्वतः विकसित केलेल्या आण्विक पाणबुडीचे प्रॉजेक्ट तसे जुनेच आहे . त्यावर मोठा खर्चही झालेला आहे . भविष्यात आपल्याला आपली संरक्षण क्षमता मात्र स्वतःच्याच जोरावर विकसित करावी लागणार आहे . आणि याला पर्यायही नाही . रशियाकडून ' अॅडमीरल गोर्शकोव्ह ' या युद्धनौकेबाबत मिळणारी सापत्न वागणूक देशासाठी अपमानकारक अशीच आहे . पण गरजेमुळे भारताचे हात बांधलेले आहेत . अमेरिकेशी सुधारणारे संबंध देखील पुरेसे असणार नाहीत . कारण त्यांची शस्त्रसंपदा देखील जाचक आणि किचकट अटींनी बांधलेली असेल . म्हणूनच संरक्षण संशोधन आणि विकासावर भारताला अधिक लक्ष द्यावे लागेल . वैज्ञानिक संशोधनाचे क्षेत्र अधिक आकर्षक करावे लागेल . वैज्ञानिक कौशल्याला विकसित करावे लागेल .
Comments